परळीतील विटभट्टी कामगाराने केला पत्नीचा खून !
दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शिवारात समोर आली आहे. आज भल्या भल्या पहाटे समोर आलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान पत्नीची हत्या केल्यानंतर संशयित आरोपी पती फरार झाला आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
जळगावच्या भुसावळ तालुक्यातील विल्हाळा शिवारात घटना घडली असून सना शेख असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान विल्हाळा शिवारात किशोर पाटील (रा. सुसरी) यांची विटभट्टी आहे. या वीटभट्टीवर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील नियाजउद्दीन शेख मन्सूर कुटुंबासह कामाला असून याच ठिकाणी ते वास्तव्यास होते. तर त्यांच्यासोबत मुलगी सना आणि जावई अजीज सलीम शेख हे देखील चार मुलांसह विटा तयार करण्याचे काम करीत होते. सर्व कुटुंब एकाच परिसरातील पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहत होते.
अजीज सलीम शेख याला दारूचे व्यसन असल्याने दारू पिऊन रोज पत्नीशी वाद घालत होता. २२ मार्चला देखील दारूच्या नशेत अजीज शेख घरी आला. यानंतर त्याने पत्नी सना (वय २५) हिला शिवीगाळ करू लागला. शेजारी असलेल्या सासूने दोघांचे भांडण ऐकून अजीज यास शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने वाद कमी झाल्यानंतर अजीज व सना हे दोघेजण मुलांसह झोपण्यासाठी गेले.
दरम्यान आज पहाटे सना हिची आई कामासाठी उठवायला गेल्यानंतर खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे दरवाजा तोडून पाहिले असता सना रक्तबंबाळ अवस्थेत मृत पडल्याची दिसून आली. घरातील हे दृश्य पाहून सना हिची आई व अन्य मजूर हादरले होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गळा आवळून सण हिची हत्या करण्यात आल्याचा संशय असून सना हीच पती अजीज फरार आहे. त्याचा शोध पोलीस करत आहेत.